वॉशिंग्टन – अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचाराचे वातावरण तापू लागले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनीही आता आपले विरोधक ज्यो बिडेन यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतो आहे.
आज येथे एका प्रचारसभेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, जर या निवडणुकीत बिडेन जिंकले तर चीन जिंकणार आहे. त्यांचा विजय हा चीनचा विजय असेल. त्यामुळे चीनला रोखायचे असेल तर आपल्याला बिडेन यांना रोखणे गरजेचे आहे.
ज्यो बिडेन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 47 वर्षे तुमच्या नोकऱ्या चीनला रवाना करण्याचे काम केले आहे हे सारा देश जाणतो. गेली चार वर्षे मी या नोकऱ्या पुन्हा देशात परत आणण्याचाच प्रयत्न केला आहे, असे ट्रम्प म्हणाले.
ओहियो प्रांतातील डेटोन येथील प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, अध्यक्षपदाची ही निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. देशाला नव्या उंचीवर न्यायचे आहे की झोपाळू बिडेन यांना जिंकून देशाचे अर्थकारण रसातळाला न्यायचे आहे याचा निर्णय देशवासीयांना करायचा आहे.
बिडेन यांच्या पक्षाचे करविषयक धोरण हे अमेरिकन नागरिकांवरील बोजा वाढवणारे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही ही निवडणूक जिंकलो तर अमेरिका जिंकणार आहे, येथील नागरिक जिंकणार आहेत, असेही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले.
ट्रम्प हे गेले काही दिवस करोना संक्रमणाची भीती न बाळगता हजारोंच्या सभा घेत आहेत. त्यावर सध्या टीका होते आहे, त्याचा संदर्भ देऊन ट्रम्प म्हणाले की, या सभा म्हणजे विरोधकांच्या मूर्खपणाचा निषेध सभा आहेत. बिडेन हे 50 वर्षे राजकारणात आहेत, या 50 वर्षांच्या काळात त्यांनी देशाच्या अर्थकारणाचे मूर्खपणातून नुकसानच केले आहे, असेही ते म्हणाले.