अर्णब गोस्वामींच्या जीवाला धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी राज्य सरकारची असेल”

भाजपा नेते नारायण राणे यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान,त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी हि राज्य सरकारची असेल असे म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असं म्हटलं.

“अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे.

गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,” असं म्हणत नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.