Mamata banerjee | Akhilesh yadav – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. संपूर्ण देशात भाजपला खऱ्याअर्थी कुणी राजकीय आव्हान देत असतील; तर त्या ममता आहेत, असे त्यांनी म्हटले. एका कौटूंबिक सोहळ्यासाठी अखिलेश बंगालची राजधानी कोलकत्यात पोहचले. त्यांनी ममतांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ममता यांच्या पद्धतीनेच भाजपचा प्रभावीपणे विरोध केला जाऊ शकतो. बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे. केवळ सन्मानजनक पराभव व्हावा एवढीच त्या पक्षाची इच्छा असेल, अशी शाब्दिक टोलेबाजी अखिलेश यांनी केली. बंगालमधील निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अशात अखिलेश यांची भेट ममता आणि त्यांच्या पक्षाचा (तृणमूल कॉंग्रेस) उत्साह वाढवणारी ठरली. अखिलेश यांनी ममतांची स्तुती करून अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसलाही डिवचल्याचे मानले जाते. सप, कॉंग्रेस आणि तृणमूल हे तिन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या इंडिया आघाडीचे घटक आहेत. त्या आघाडीतील कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष आहे.