पिंपरी – ऑफलाइन पीयूसी नोंदणी बंद करून शासनाने सर्व वाहनांचे पीयूसी आता ऑनलाइन करण्याची सक्ती केली आहे. पूर्वी चुकीच्या पद्धतीने पीयूसी नोंदणी केली जात होती. मात्र, आता ऑनलाइन नोंदणी होत असल्यास त्यास आळा बसेल. परंतु तरीही चुकीच्या बाबी आढळल्या तर, त्या पीयूसी चालकावर सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड, मोशी येथील आरटीओ कार्यालयात नुकत्याच झालेल्या ऑल पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनच्या वतीने सर्व चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भंडारे, नितीन सावंत, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष रमेश चव्हाण, उपाध्यक्ष लक्ष्मण जोशी, सचिव राकेश सायकर, खजिनदार सागर सावंत, मोटार निरीक्षक वासुदेव भगत आणि भरत कांबळे व 60 पीयूसी चालक उपस्थित होते.
उपप्रादेशिक अधिकारी पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, चांगल्या प्रकारे काम करून नागरिकांच्या अडचणी दूर करायला हवे. दरम्यान, पीयूसीचा दर हा 2011 पासून आहे तसाच असून, त्यात बदल झाला नाही. मात्र, दिवसेंदिवस त्याचा खर्च वाढत आहे. आता ऑनलाइन पद्धतीमुळे प्रिंटर, इंटरनेट, मनुष्यबळ याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे त्याचा विचार करून पीयूसीचा दर वाढवावा, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने या वेळी करण्यात आली आहे.