भारतविरोधी कारवाया केल्यास…, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट तर चीनला अप्रत्यक्ष इशारा

पिथौरागढ – भारत शेजारी देशांशी चांगले संबंध ठेऊ इच्छितो. मात्र, भारतविरोधी कारवाया केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पाकिस्तानला थेट, तर चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला.

उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात राजनाथ बोलत होते. भारताने कधीच कुठल्या देशावर हल्ला केला नाही. परकी भूमीही भारताने कधी बळकावली नाही. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ही भारताची संस्कृती आहे. मात्र, काहींना ते समजत नाही. ती त्यांची सवय आहे की प्रवृत्ती ते ठाऊक नाही, असे त्यांनी म्हटले.

पाकिस्तानचा नामोल्लेख करून ते म्हणाले, तो देश दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याबद्दल त्या देशाला याआधीच कठोर संदेश देण्यात आला. प्रसंगी सीमाही ओलांडू शकतो हे दाखवून दिले, असे नमूद करत त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा संदर्भ दिला. पुढे बोलताना चीनचा नामोल्लेख टाळून ते म्हणाले, आमचा आणखी एक शेजारी आहे. त्याला काही बाबी समजत नसल्याचे दिसते. कुणी भारताची एक इंच जमीनही बळकावण्याचा प्रयत्न केला तर जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.