शेतकरी मार्केटिंग क्षेत्रात उतरल्यास विकास साधेल

भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव

नगर – आंदोलन करून प्रश्‍न सुटणार नसून, शेतकऱ्यांनी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागणार आहे. पिकवण्याबरोबर मार्केटिंग क्षेत्रात शेतकरी उतरल्यास त्याचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. अन्न-धान्य पिकवणारा उपाशी तर विकणारा तुपाशी अशी अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य किंमत मार्केटिंगने मिळणार असल्याची भावना व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केली.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त शेतकरी चळवळी समोरील आव्हाणे व पुढील वाटचाल या विषयावर शिंदे बोलत होते. मार्केटयार्ड शेतकरी निवास येथे झालेल्या या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देऊन, कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी विलास नलगे, प्रदेश सचिव किरण वाबळ, प्रदेश उपाध्यक्ष असिफभाई शेख, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, निलेश तळेकर, संतोष हांडे, अमोल उगले, संतोष कोरडे, संतोष राम वाडेकर, संतोष वाबळे, रोहन आंधळे, सीताराम देठे, गणेश चौधरी, गणेश जगदाळे, रोहिदास धुमाळ, राधुजी राऊत आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, परदेशात शेतकऱ्यांनी माल पाठविल्यास त्याला योग्य भाव मिळणार आहे. यासाठी मार्केटिंग व व्यापार कौशल्याची गरज असून, या क्षेत्राकडे शेतकऱ्यांच्या मुलांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपला विकास साधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटितपणे एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.

संतोष वाडेकर यांनी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची वाटचाल तीसऱ्या वर्षात होत असताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी संघटनेची पुढील ध्येय धोरणे स्पष्ट केली. तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर 1 जूनचा ऐतिहासिक संप, दूध आंदोलन, कांदा प्रश्‍नावरील आंदोलन, ऊस आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालावर भाकड जनावरे बांधून करण्यात आलेले आंदोलनाची माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधार म्हणून आज संघटनेकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोहिदास भागवत, बबन कानडे, अण्णासाहेब विष्णुपुरी, पोपट खुळे आदी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. तर कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे धनंजय धोर्डे, बाळासाहेब पठारे, शरद पवळे, साईनाथ घोरपडे, शरद मरकड, अनिल शेटे, रामदास घावटे, पोपट खोसे, सुभाष चाटे, तुकाराम खेडकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शिंगोटे यांनी केले. आभार अशोक आंधळे यांनी मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.