नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरचे काम आता हळू हळू पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र या मंदिरात प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहेत. परंतु या मुर्त्या कोणत्या दगडापासून तयार करण्यात येणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, याचा शोध घेणाऱ्या एका पथकाला या मुर्त्या बनवण्यासाठी दगड मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदू धर्मात अनेक दगड शुभ मानले जातात. भगवान राम आणि माता सीता यांच्या मूर्तीसाठी कोणता दगड योग्य असेल, हे ठरवण्याचा आणि दगडाचा शोध सुरू झाला. आता अखेरीस यावर शिक्तामोर्तब झाला आहे. राम जन्मभूमि मंदिर निर्माण समितीने दिलेल्या माहितीनुसार, प्रभू राम आणि सीत मातेची मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवली जाणार आहे. या दगडाच्या शोधात एक पथक गेल्या अनेक महिन्यांपासून मेहनत घेत होते. पण, आता प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी 600 वर्ष जुना शाळीग्राम दगड सापडला आहे. हा दगड एक लाख वर्ष जुना असल्याचे म्हटले जात आहे.
राम मंदिराच्या गर्भगृहात राम-सीतेच्या मूर्तीसाठी शालिग्राम दगड नेपाळमधून अयोध्येत आणला जात आहे. नेपाळमध्ये काली गंडकी नावाची नदी आहे. मूर्तीसाठी या नदीतून दोन मोठे शाळीग्राम खडक बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही खडकांचे वजन 26 आणि 14 टन आहे. हे दगड सुमारे सात फूट लांब आणि पाच फूट रुंद आहेत. या दगडांवर कोरीव काम करून प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यात येणार आहे.
शाळीग्राम दगड नेपाळच्या काली गंडकी नदीत आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आढळतो. साधारणपणे हा मुक्तिनाथ काली गंडकी नदीच्या काठी आढळतो. शास्त्रज्ञांच्या मते, शालिग्राम दगड हा एक प्रकारचा जीवाश्म आहे. शाळीग्राम दगडाचे एकुण 33 प्रकार आहेत. हिंदू धर्मानुसार, शाळीग्राम दगड भगवान विष्णूचे स्वरूप आहे. तसेच शाळीग्रामची शिवलिंगाच्या रूपातही पूजा केली जाते.