नवी दिल्ली : आजपर्यंत देवाची भक्ति-भावाने पूजा केलेली किंवा मंदिरात कोट्यवधींच्या देणग्या दिल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. परंतु, कधी कोणी देवाच्या मूर्तीचा हात तुटला म्हणून ती मूर्ती दवाखान्यात नेल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का? वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही अजब-गजब घटना सत्यात घडली आहे.
झालं असं कि, आग्राच्या सरकारी दवाखान्यात लेख सिंह नावाचे पुजारी मोठ्याने रडत आणि हातात कृष्णाची तुटलेली मूर्ती घेऊन आले. त्यांनी यावेळी आपल्या लड्डू गोपाल यांच्यावर उपचार करण्यात यावे अशी मागणी केली. त्यांची ही मागणी ऐकून डॉक्टरसह सर्व स्टाफ गोंधळात पडला. त्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्याने पुजाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र पुजारी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या लड्डू गोपाल यांच्यावर उपचार करून घ्यायचे होते.
लेख सिंह यांनी यावेळी म्हटले,” सकाळी लड्डू गोपाल यांना स्नान घालत असताना आपल्या हातून ते निसटले आणि खाली पडले त्यावेळी त्यांचा एक हात तुटला. त्यांच्या दुखापतीने आपल्याला खूप मोठा धक्का बसला आहे कारण आपण आपल्या भगवान कृष्णासोबत अतूट नाते आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात घेऊन आलो. सुरुवातीला माझ्या मागणीला दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र माझ्या अथक विनवण्यानंतर माझ्या देवावर उपचार करत त्यांना पट्टी बांधण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, जिल्हा रुग्णलायलातील मुख्य अधीक्षक डॉ.अशोक कुमार अग्रवाल यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक पुजारी आपल्या भंगलेल्या मूर्तीसह रुग्णालयात दाखल झाले असून त्या मुर्तीवर त्यांना उपचार करायचे आहेत असे सांगितले. दरम्यान, त्या पुजाऱ्याच्या भावनेचा आदर करत रुग्णालयाने ‘श्री कृष्ण’ या नावाने पावती फडात त्या मूर्तीवर उपचार केले असल्याचे सांगण्यात येत आहे.