नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा केवळ एक सण नाही तर तेथील संस्कृतीचा भाग आहे. हेच कारण आहे कि पश्चिम बंगालच्या मूर्ती कलाकार केवळ त्यांच्या राज्यातच नव्हे तर बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्येही प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये सामाजिक संदेशांच्या रूपातही दुर्गा पूजा मंडप बनविले जातात. अशातच दुर्गापूजनामध्येही कोलकाताचा दुर्गा पूजा मंडप एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहे.
दक्षिण कोलकात्यामधील बेहाला येथील एखा दुर्गा पूजा समितीने यंदा आपल्या मंडळाच्या वतीने मंडपात दुर्गा मातेऐवजी एका स्थलांतरित मजूर महिलेची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेच्या कडेवर एक लहान मूल असल्याचे दाखवण्यात आले आहे.
पूजा समितीच्या संचालकांनी करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचे दर्शवण्यासाठी ही मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मूर्ती म्हणजे स्थलांतरित मजुरांचे केवळ दु:खच नाही तर त्यांची जिद्द आणि हिंमत याचेही प्रतिक आहे.
या मंडपामध्ये केवळ दुर्गा नाही तर इतर देवींच्या मूर्तीही बदलण्यात आल्या आहेत. लक्ष्मी आणि सरस्वती देवीच्या ऐवजी स्थलांतरित मजूरांच्या मुलींच्या मुर्ती स्थापन करण्यात येतील. या मुलीपैकी एका मुलीच्या हातात घुबड आहे जे लक्ष्मीचे वाहन आहे. तर दुसरीच्या हातात बदक असून ते सरस्वती देवीचे वाहन आहे. या सर्वांबरोबर एक हत्तीचे मुंडके असणारा मुलगाही दाखवण्यात आला असून तो गणपतीचे प्रतिक आहे. मंडपात मुख्य स्थलांतरित मजूर मदतीसाठी दुर्गा मातेकडे जाताना दाखवले आहे.
स्थलांतरित मजूर महिलांच्या मूर्तीला रिंकू दास यांनी आकार दिला आहे. त्या म्हणाल्या कि, वास्तविक त्या स्त्रीचे वर्णन देवी म्हणून केले गेले आहे. ती धैर्यवान आहे आणि रणरणत्या उन्हात आपल्या मुलांबरोबर प्रवास करत आहे. ती आपल्या मुलांसाठी अन्न, पाणी आणि मदत शोधत आहे, असे त्यांनी सांगितले.