विज्ञानविश्‍व: नद्यांना विळखा प्रतिजैविकांचा

File photo....

डॉ. मेघश्री दळवी

नद्यांचे स्वत:चे प्रश्‍न असतात आणि त्या प्रश्‍नांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे, शहर नियोजनात नद्यांना योग्य स्थान दिले पाहिजे, असे विचार गेली काही वर्षे सातत्याने पुढे येत आहेत. म्हणूनच नद्यांचा तपशीलवार अभ्यास, नद्या स्वच्छ ठेवणे आणि आक्रसत गेलेल्या नद्यांना पुन्हा मुक्‍त स्वरूपात आणणे अशा योजना मूळ धरू लागल्या आहेत.

याच संदर्भात अलिकडे जगातल्या 91 नद्यांच्या अभ्यासाचा एक मोठा प्रकल्प पार पडला. आग्नेय आशियातली मेकॉन्ग, नैऋत्य आशियातली टिग्रीस, लंडनची थेम्स, अशा वेगवेगळ्या नद्यांचा अभ्यास करणारा एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवरचा हा पहिलाच प्रकल्प. त्यात पुढे आलेला सर्वाधिक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे त्यातल्या सुमारे दोन तृतीयांश नद्यांना प्रतिजैविकांचा जीवघेणा विळखा पडलेला आहे!

युरोपमधल्या डॅन्यूब नदीत सात वेगवेगळी प्रतिजैविकं मोठ्या प्रमाणात आढळली. त्यातल्या क्‍लॅरीथ्रोमायसिनचे प्रमाण सुरक्षित प्रमाणाच्या चौपट होते. प्रगत देशांची ही स्थिती, तर विकसनशील देशांची कल्पना करणेदेखील कठीण होईल. बांगलादेशातल्या एका नदीत तर मेट्रोनिडाझोल हे प्रतिजैविक सुरक्षित प्रमाणाच्या तीनशे पट प्रमाणात होते!
एवढी प्रतिजैविके नद्यांमध्ये येतात कुठून? औषधी कंपन्या आणि इतर ठिकाणाहून येणारे सांडपाणी कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे नद्यांमध्ये पोहोचते. पाण्यावर प्रक्रिया करणारी संयंत्रे प्रतिजैविकांचा पूर्ण नाश करू शकत नाहीत. प्रतिजैविके सक्रिय असतात आणि पाण्यातून सजीवांच्या शरीरात गेल्यावर आरोग्यावर थेट परिणाम करू शकतात म्हणून त्यांचा धोका खूप वरच्या पातळीवरचा असतो. प्रतिजैविकांमुळे या नद्यांमधल्या परिसंस्थेला खूप मोठा धक्‍का पोहचत आहे. त्यांच्यामधले सूक्ष्मजीव, जीवाणू, शैवालासारख्या वनस्पती, मासे आणि इतर समुद्री जीव यांचे आयुष्य संकटात येत आहे आणि आपणही या परिसंस्थेचा एक घटक असल्याने आपल्या आयुष्यातही अपायकारक परिणाम होत आहेत.

प्रतिजैविकांचा छोट्या प्रमाणात डोस मिळाला की जीवाणूंमध्ये प्रतिजैविकांना न जुमानण्याची प्रवृत्ती वाढीला लागते. प्रतिजैविकांना प्रतिरोध करणाऱ्या अशा जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढते आहे. या जीवाणूंचा आपल्यावर हल्ला झाला की उपलब्ध प्रतिजैविकांच्या ठराविक प्रमाणातल्या औषधांचा काहीही उपयोग होत नाही. मग औषधांचे प्रमाण वाढवावे लागते किंवा नवी प्रतिजैविकं तयार करावी लागतात. यादरम्यान रुग्णांना काहीही उतार पडला नाही तर जीव गमवावा लागतो. 2016 मध्ये झालेल्या एका पाहणीनुसार दरवर्षी सात लाखांहून अधिक लोकांना या कारणाने मृत्यू आलेला आहे.

ही वाढीव औषधे किंवा नवी प्रतिजैविके पुन्हा एकदा पाण्यात जातात आणि हेच चक्र पुन्हा-पुन्हा सुरू राहते. त्यामुळे एक वेळ अशी येईल की रोगांचे जीवाणू कोणत्याही प्रकारच्या कितीही प्रमाणातल्या प्रतिजैविकांना अजिबात दाद देणार नाहीत. अशा वेळी आपण काय करणार आहोत? बरं, ही काही फार दूरची गोष्ट नाही. ब्रिटनमधल्या एका अभ्यासानुसार 2050 साली अशी वेळ येणार आहे, अवघ्या तीस वर्षांत! म्हणूनच आता गरज आहे ती नद्यांना या भयंकर विळख्यातून सोडवायची. मात्र त्यासाठी खूप वेगाने आणि कठोर उपाय योजायची वेळ आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)