पुणे – निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यादांच क्युआर कोडच्या माध्यमातून मतदारांची ओळख पटविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी “बुथ ऍप’ तयार केले असून मतदाराला या ऍपच्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्राशिवाय मतदान करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम कसबा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. यामुळे मतदानासाठीचा वेळ वाचणार असून मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
मतदान केंद्रामध्ये अधिकारी मतदाराची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्राची मागणी करतात. ओळखपत्र दाखविल्यानंतर त्याची नोंद पुस्तिकेमध्ये करण्यात येते. प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र तपासून त्याची नोंद घेण्यासाठी वेळ लागतो. यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागतात. यामुळे मतदारांना ताटकळत उभे रहावे लागते. यापासून मतदारांची सुटका व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे ऍप तयार केले आहे.
कसबा मतदारसंघातील मतदारांना गुगल प्लेस्टोअरमधून “बुथ ऍप’ डाऊनलोड करावे लागणार आहे. यामध्ये ईव्हीपी नावाचा एक टॅब आहे. यामध्ये मतदाराला त्याचा मोबाइल क्रमांक टाकायचा आहे. त्यावर तुम्हाला एक ओटीपी मिळेल हा ओटीपी टाकल्यानंतर संबंधित उमेदवाराला एक क्युआर कोड मिळणार आहे. हा क्युआर कोड संबंधित मतदान केंद्र अधिकारी यांना दाखवायचा आहे. हा कोड संबंधित अधिकारी स्कॅन करून घेणार आणि कोणत्याही कागदपत्राशिवाय मतदाराला मतदान करण्याची संधी मिळणार आहे.