गोडोलीतील भैरवनाथ ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आदर्शवत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना दोन लाखांचा मदतनिधी

सातारा  – कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यातील काही भागाला महापुराचा मोठा तडाखा बसला. पूरग्रस्तभागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी विविध स्तरातून मदतीचा हात मिळत आहे. सातारा येथील गोडोली गावातील भैरवनाथ ट्रस्टनेही मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला असून विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या भैरवनाथ ट्रस्टचे कार्य आदर्शवत आहे, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

गोडोली येथील भैरवनाथ ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांसाठी दोन लाखांचा मदतनिधी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी ट्रस्टचे सचिव व्यंकटराव मोरे, अध्यक्ष भरत सपकाळ, खजिनदार सुनील मोरे पाटील, नगरसेवक शेखर मोरे पाटील, अशोक मोरे पाटील, पोपटराव मोरे, बाळासाहेब मोरे, बाळूनाना मोरे, राजू घुले, पींतराव मोरे, दिनकर मोरे, अशोक मोरे, तुकाराम मोरे, रवी पवार आदी उपस्थित होते.

भैरवनाथ ट्रस्टमार्फत आपत्तीग्रस्त, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांना सातत्याने मदत केली जाते. तसेच समाजातील गरजू लोकांना, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू यांना आर्थिक स्वरुपात मदत करुन त्यांचा गौरव केला जातो. तसेच दुष्काळ निवारणासाठी काम करणाऱ्या पाणी फौंडेशनला तसेच सातारा येथील कैलास स्मशानभुमीसाठीही या ट्रस्टमार्फत मदत देण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमात ट्रस्टचे योगदान असते, अशी माहिती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी दिली. ट्रस्टचे कार्य मोलाचे असून अशा संस्थांच्या कार्याचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.