– योगेश मारणे
न्हावरे – शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये आजपासून टप्प्याटप्प्याने काटेकोरपणे जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी दिली. आज न्हावरे-शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटांमध्ये एक दिवसीय जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये पुढे जनता कर्फ्यु ठेवण्यात येणार आहे. मात्र शासन निर्णयानुसार लॉकडाऊन सुरूच राहणार आहे, असेही ढवळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
न्हावरे-शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटात फक्त हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स आज सुरू राहणार आहेत. किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्री दुकाने आणि कृषी सेवा केंद्रे बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे व विनाकारण रस्त्याने फिरू नये. रस्त्याने कोणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने पोलिसांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून लॉकडाऊन सोबतच जनता कर्फ्यु प्रत्येक गावात टप्प्याटप्प्याने ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला आहे. त्याला प्रशासनाने अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढून कार्यवाहीसाठी सूचना केल्या आहेत.
शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात काही दिवसांपूर्वी करोनाचा रुग्ण सापडल्यामुळे या परिसरात जनता कर्फ्यु कटाक्षाने पाळला जात आहे. जनता कर्फ्यु ठेवण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून स्वयंपूर्तीने मागणी होत होती. त्यामुळेच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. येथून पुढे तालुक्यातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद गटनिहाय एक दिवस जनता कर्फ्यु व इतर दोन दिवस स्वयंपूर्तीने कर्फ्यु असे तीन दिवस जनता कर्फ्यु ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी सहमती दर्शवली आहे. याचा फायदा करोनाची साखळी तोडण्यासाठी होईल. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग ठेवावे, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गटनिहाय कर्फ्यु पुढीलप्रमाणे
१) ३ एप्रिल – न्हावरे-शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गट.
२) ४ एप्रिल – वडगाव रसाई-मांडवगण फराटा जिल्हा परिषद गट
३) ६ एप्रिल – रांजणगाव सांडस-तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट.
४) ७ एप्रिल – टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गट.
५) ८ एप्रिल – कारेगाव-रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट.