खासगी रुग्णालयांचे बेड परत देण्याबाबत आज होणार निर्णय
पुणे – करोनाचा उद्रेक झाल्याने महापालिकेने शहरातील 84 खासगी रुग्णालयांचे 5,284 बेड्स ताब्यात घेतले होते. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडयापासून करोनाचा प्रसार मंदावल्याने खासगी हॉस्पिटल्सचे ताब्यात घेतलेले सुमारे 60 ते 70 टक्के बेड्स रिकामे राहात आहेत. त्यामुळे ते इतर रुग्णांच्या उपचारासाठी देण्याची मागणी खासगी हॉस्पिटल्सनी केली आहे. मात्र, त्यातील केवळ 100 टक्के आयसोलेशन बेड आणि 50 टक्के बेड्स परत देऊन 50 टक्के बेड्स, आयसीयू तसेच व्हेंटिलेटर बेड्स महापालिकेच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे बैठक होणार आहे.
सध्या बेड्स शिल्लक राहत असल्याने ते पुन्हा ताब्यात देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनांनी पालिकेकडे केली आहे. मात्र, महापालिकेने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे विश्लेषण केले असता, ज्यांच्यावर आयसीयू तसेच व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, अशांच्या उपचारांचा कालावधी अधिक आहे. अशा रुग्णांची टक्केवारी पाहता तूर्तास हे बेड हॉस्पिटल व्यवस्थापनास देता येणार नसल्याचे नमूद केले आहे.
तर, जी हॉस्पिटल छोटी आहेत पण, तेथे कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर एकत्र उपचार केले जात आहेत, अशा हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमधून वगळून सर्व रुग्णांच्या उपचारास सुरू करण्यास मान्यता देण्यासही सहमती दर्शवली आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी होईल.
…तर 24 तासांच्या आत बेड परत घेणार
काही ठराविक बेड्स परत देताना, गरज भासल्यास 24 तासांच्या आत हे बेड पुन्हा उपलब्ध करून देण्याचे बंधनखासगी रुग्णालयांना घातले जाणार आहे. तसेच महापालिका निश्चित करून देईल, त्या प्रमाणे हे बेड उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्सचे केवळ आयसोलेशन बेड्सच परत मिळणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सध्याच्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे.