मुंबई – चौथ्या तिमाहीत आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाल्यामुळे आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरच्या भावात सोमवारी एक टक्क्यापर्यंत वाढ झाली.सोमवारी आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरचा भाव 752 रुपयांपर्यंत वाढला होता. बॅंकेच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात 59 टक्क्यांची वाढ होऊन या तिमाहीत बॅंकेला 7,019 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आगामी काळात या बॅंकेचा नफा वाढेल. या आशेने बऱ्याच गुंतवणूकदारांनी दीर्घ पल्ल्याचा विचार करून या बॅंकेचे शेअरची खरेदी केल्यामुळे शेअरचा भाव वाढला असल्याचे दिसून येते.
मात्र फ्युचर रिटेल समुहातील कंपन्याच्या शेअरचे भाव आज 20 टक्क्यापर्यंत कोसळले. फ्युचर समूहाने आपल्या सर्व कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीला 24,713 कोटी रुपयात विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फ्युचर रिटेल समूहातील कंपन्यांना कर्ज देणाऱ्या वित्त संस्थांनी या व्यवहाराला नकार दिला आहे. त्यामुळे या व्यवहारातून रिलायन्स समूहाने अंग काढून घेतले आहे. यामुळे सोमवारी फ्युचर एंटरप्राइजेस, फ्युचर लाइफस्टाइल, फ्युचर सप्लाय या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले.