#ICCWorldCup2019: स्टार्क-कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजची शरणागती; ऑस्ट्रेलियाचा १५ धावांनी विजय

नॉटिंगहॅम – विश्वचषक स्पर्धेच्या हाय-होल्टेज सामन्यामध्ये आज विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगला होता. अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला १५ धावांनी विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियाने विंडीजपुढे ठेवलेले २८९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी राखत कॅरेबियन फलंदाजांना ९ गड्यांच्या मोबदल्यात २७३ धावांमध्ये रोखले.

आजच्या सामन्यामध्ये वेस्टइंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एकापाठोपाठ एक किवी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत कॅरेबियन गोलंदाज सुरुवातीला आपल्या कर्णधाराचा निर्णय सफल ठरवताना दिसत होते. सामन्यातील १६.१ षटकांच्या खेळामध्येच अर्धा किवी संघ तंबूत परतल्याने ऑस्ट्रेलिया २०० धावांचा टप्पा तरी पार करेल काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र स्टीव्ह स्मिथ व केरी यांनी आत्मविश्‍वासाने खेळी करत ३०व्या षटकांपर्यंत संघाला लागलेली गळती रोखली.

सहाव्या विकेटसाठी दोघांनी ६८ धावा जोडताना १४ षटके खेळून काढली. केरी व्यक्तिगत ४५ धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या नॅथन कोल्टिअर नील याने तडाखेबंद खेळी करत अवघ्या ६० चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९२ धावा ठोकल्या. स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या बाजूने आपल्या अनुभवाचा कस लावत १०३ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ७३ धावा करत नॅथनला संयमी साथ दिली. अवघ्या ७९ धावांवर निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (७३), केरी (४५) आणि नॅथन कोल्टिअर नील (९२) यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला २८८ धावांचे सन्मानजनक आव्हान उभारता आले. सामन्यामध्ये वेस्ट इंडिजकडून ब्रेथवेटने ३ तर ओशाने थॉमस, शेल्ड्रॉन कॉट्रेल आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले

२८८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कॅरिबियन संघाची सुरुवात देखील पडझडीनेच झाली. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विंडीजचा सलामीवीर एव्हीन लेविस पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथच्या हातात झेल देत तंबूत परतला. विंडीजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल आपल्या स्फोटक अंदाजात अवतरण्याची चिन्हं असतानाच त्याला मिचेल स्टार्कने पायचीत करत तंबूत धाडले. गेलने ४ चौकारांसह १७ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. यानंतर फलंदाजीस उतरलेल्या होपने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संयमी फलंदाजी केली तर दुसऱ्या बाजूने पुरणने चौकार व षटकारांच्या मदतीने धावफलक हालता ठेवला. मात्र ३६ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १ षटकार खेचत ४० धावांची खेळी करणाऱ्या पुरणला ऍडम झाम्पाने तंबूत धाडले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या हेटमायरला वयक्तिक २१ धावांवर असताना पेट कमिन्सने धावचीत केले तर धावपट्टीवर चांगला जम बसवलेल्या होपला उस्मान ख्वाजा करवी झेलबाद करत कमिन्सने आपल्या खात्यात आणखी एका बळीची नोंद केली. यानंतर कर्णधार जेसन होल्डर (५१) वगळता अन्य कोणताही कॅरेबियन फलंदाज तग धरू न शकल्याने त्यांना धावांनी पराभव पत्करावा लागला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.