#ICCWorldCup2019 : सराव सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव

न्यूझीलंडचा 6 विकेटस्‌नी विजय : सराव सामन्यात आघाडीचे फलंदाज अपयशी

ओव्हल (लंडन) – विश्‍वचषक स्पर्धेतील पहिल्याच सराव सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसमोर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. यामुळे न्यूझीलंडविरुद्ध भारताला 6 विकेटस्‌ने लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. 180 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 37.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर या दोघांनी अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

निर्धारित आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक ठरली. जसप्रित बुमराहने दुसऱ्याच षटकात कॉलिन मुन्रो (4) याला पायचित केले. सलामीवीर मॉर्टिन गुप्टिलही 22 धावा करून परतला. त्याला हार्दिक पांड्याने के. राहुलकरवी झेलबाद केले.

कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी सावध खेळ करत तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी करत संघाला विजयासमीप नेले. यझुवेंद्र चहलने विल्यम्सनला बाद करत ही जोडी फोडली. विल्यम्सनने 87 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार खेचत 67 धावांची खेळी केली. त्यानंतर विजयासाठी 1 धाव बाकी असताना रॉस टेलर 71 धावांवर बाद झाला. त्याला रवींद्र जडेजाने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. भारताकडून जसप्रित बुमराह, हार्दिक पांड्या, यझुवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बोल्टने पहिल्याच षटकात रोहितला पायचित करत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सलामीवीर शिखर धवनलाही बोल्टने बाद केले. चौथ्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलला बोल्टने सहा धावांवर बाद करत भारताला पहिले तीन धक्‍के दिले.

पहिल्या दहा षटकांत भारताच्या धावफलकावर नाममात्र 39 धावा होत्या. कर्णधार विराट कोहली ग्रॅंडहोमीचा बळी ठरला. कोहलीने अवघ्या 18 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या (30), महेंद्रसिंग धोनी (17) आणि दिनेश कार्तिक (4) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पांड्या आणि कार्तिकला निशामने, तर धोनीला साऊदीने बाद केले. तेव्हा धावफलकावर शंभर धावा लागत भारताचे सात गडी तंबूत परतले. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव (19) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी नवव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. तो फर्ग्युसनचा बळी ठरला. ट्रेन्ट बोल्टने 33 धावांत सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर जिमी निशामने 3 विकेट घेत त्याला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक :

भारत – 39.2 षटकांत सर्वबाद 179 (विराट कोहली 18, हार्दिक पांड्या 30, महेंद्रसिंग धोनी 17, रवींद्र जडेजा 54, कुलदीप यादव 19. ट्रेन्ट बोल्ट 33-4, जिमी निशाम 26-3, टीम साऊदी 26-1, कॉलिन डी ग्रॅन्होम 12-1, लोकी फर्ग्युसन 33-1).
न्यूझीलंड ः 37.1 षटकांत 4 बाद 180 (मार्टिन गुप्टिल 22, केन विल्यम्सन 67, रॉस टेलर 71, हेन्री निकोलस नाबाद 15. जसप्रित बुमराह 2-1, हार्दिक पांड्या 26-1, यझुवेंद्र चहल 37-1, रवींद्र जडेजा 27-1)

Leave A Reply

Your email address will not be published.