#ICCWorldCup2019 : ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर रोमहर्षक विजय

मिचेल स्टार्कचे पाच बळी

नॉटिंगहॅम -मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 15 धावांनी पराभव करत स्पर्धेतील लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली.

विजयासाठी 289 धावांचे आव्हानास सामोरे जाताना विंडीजने ख्रिस गेल याच्यासह पहिले दोन गडी लवकर गमावले. मात्र शाय होप (68), निकोलस पूरन (40) यांनी संघाचा डाव सावरला. त्यांच्यापाठोपाठ जेसन होल्डर यानेही धडाकेबाज खेळ करीत 51 धावा जमविल्या. शिमोरन हिटमेयर (21) याचेही प्रयत्न अपुरे पडले.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत सर्वबाद्‌ 288 धावांची मजल गाठली. वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ अवघ्या 79 धावांमध्ये गारद झाला. तथापि नॅथन कोल्टिअर नील व स्टीव्ह स्मिथ यांनी शैलीदार खेळ केला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियास 49 षटकांत सर्वबाद्‌ 288 धावांची मजल गाठता आली.

डेव्हीड वॉर्नर (3), ऍरोन फिंच (6), उस्मान ख्वाजा (13), ग्लेन मॅक्‍सवेल (0), मार्क्‍स स्टोइनीस (19) हे भरवशाचे फलंदाज बाद झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलियास दोनशे धावांचा पल्ला गाठता येणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र नॅथन व स्मिथ यांनी शतकी भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. ऍलेक्‍स केरी यानेही संघाच्या धावसंख्येस हातभार लावला. नॅथन याचे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत त्यांच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. एकवेळ ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 79 धावांमध्ये कोसळला. मुरब्बी फलंदाज स्मिथ व केरी यांनी आत्मविश्‍वासाने खेळ करीत संघाची घसरगुंडी थोपविली. या जोडीने 68 धावांची भर घातली. केरी याने दमदार खेळ करीत 45 धावा केल्या.

केरीच्या जागी आलेल्या नॅथन याने स्मिथच्या साथीत 102 धावांची भर घातली. स्मिथ याने सात चौकारांसह 73 धावा केल्या. नॅथन याने आठ चौकार व चार षटकारांसह 92 धावा केल्या. यावेळी वेस्ट इंडिजकडून ब्रेथवेटने तीन तर ओशाने थॉमस, शेल्ड्रॉन कॉट्रेल आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया-49 षटकांत सर्वबाद 288 (नॅथन कोल्टिअर नील 92, स्टीव्ह स्मिथ 73, कार्लोस ब्रेथवेट 3/67, आंद्रे रसेल 2/41) वि. वि वेस्ट इंडिज 50 षटकांत 9 बाद 273 (शाय होप 68, जेसन होल्डर 51, निकोलस पूरन 40, मिचेल स्टार्क 5-46, पॅट कमिन्स 2-41).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.