धोनीच्या कामगिरीला आयसीसीचा सलाम

बेंगळुरू – एकीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) महेंद्रसिंग धोनीला सातत्याने बाजूला करत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र, धोनीच्या कामगिरीला उजाळा देत सलाम केला आहे व त्याने बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद केलेल्या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या असून त्यांनी आयसीसीला धन्यवाद दिले आहेत. 

येथील चिन्नास्वामी मैदानावर 2016 साली टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम लढत भारत व बांगलादेश यांच्यात झाली होती. या लढतीत भारताने धोनीच्या कामगिरीच्या जोरावर केवळ एका धावेने विजय मिळविला होता. या सामन्यात 3 चेंडूंवर बांगलादेशला विजयासाठी दोन धावांची गरज होती, मात्र धोनीने फलंदाज पहिली धाव घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला अत्यंत वेगाने पळत येत धावबाद केले व भारताला केवळ एका धावेने विजयी केले होते. हाच फोटो व व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.

भारताने या सामन्यात 146 धावा केल्या होत्या व बांगलादेशसमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान ठेवले होते. अखेरच्या षटकांत बांगलादेशला विजयासाठी 11 धावांची गरज होती. मुशफीकुर रहीम आणि मोहमदुल्ला खेळपट्टीवर होते. हे षटक हार्दिक पंड्याने टाकले होते. रहिमने 2 चौकार फटकावून सामन्यात रंगत आणली होती. मात्र हे दोघे पाठोपाठ बाद झाले. त्यानंतर आलेल्या मुस्तफिजूरने शॉर्टबॉलवर फटका मारण्याच्या प्रयत्न केला मात्र तो मिस झाला व चेंडू यष्टिरक्षक धोनीकडे गेला.

फलंदाजांनी एक धाव घेतली तर सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये जाईल हे लक्षात घेत धोनीने क्षणाची विलंब न करता चेंडू घेऊन यष्टीकडे धाव घेतली व मुस्तफिजूर धाव पूर्ण करेपर्यंत धोनीने बेल्स उडविल्या होत्या. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली व मुस्तफिजूर बाद असल्याचे घोषित केले. इथेच सामना भारताने केवळ एका धावेने जिंकला होता. याच क्षणाचा फोटो आयसीसीने शेअर केला व त्याला चाहत्यांनी प्रचंड लाईक केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.