दुबई – ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करीत असलेल्या आयसीसीला यश येणार असल्याचे संकेत मिळत असले तरीही ती वाट बिकट राहणार आहे. एकूण 9 क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश होणार असून त्यासाठी या सर्व खेळांच्या जागतिक क्रीडा संघटनांना खेळाचे सादरीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आमंत्रित केले आहे. त्यात आयसीसीकडून टी-20 क्रिकेटचे सादरीकरण केले जाणार आहे.
या महिन्याअखेरीस या नऊ खेळांच्या संघटनांना सादरीकरण करावे लागणार आहे. यामध्ये क्रिकेटसह इतर आठ खेळांचा समावेश आहे. ब्रेक डान्सिंग, बेसबॉल-सॉफ्टबॉल, प्लॅग फुटबॉल, लॅकरोस, कराटे, किकबॉक्सिंग, स्क्वॅश व मोटार स्पोर्ट या आठ खेळांबाबत समिती आग्रही आहे मात्र, अंतिम निर्णय समिती कधी घेणार त्याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
आयसीसीच्या या सर्व प्रयत्नांना बीसीसीआयसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशांनीही पाठिंबा दिला असून अन्य पूर्ण सदस्य असलेल्या देशांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढली आहे. ऑलिम्पिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले जात होते.
मात्र, एकदिवसीय सामने सहा तास चालत असल्याने हा विचार मागे पडला. मात्र, सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेचा समावेश करण्यात आला व त्याला चांगला पाठिंबा मिळत असल्याने ऑलिम्पिकमध्येही त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही आयसीसीने व्यक्त केला आहे.
नव्या खेळांच्या समावेशाचे निकष
– ऑलिंपिक स्पर्धेचा विचार करता खर्च कमी असावा
– खेळ व खेळाडूंच्या सुरक्षा व आरोग्याला प्राधान्य
– यजमान देशाचे (अमेरिका) मत महत्त्वाचे
– जागतिक स्तरावर चाहत्यांच्या पसंतीस उतरणे गरजेचे
– भ्रष्टाचार, डोपिंगपासून दूर असावा
– देश व परिस्थितीनुसार निकषही बदलण्याचा समिताला हक्क