ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे, जी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवली जाईल. आता आयसीसी अधिकाऱ्यांची एक टीम पाकिस्तानमध्ये 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेणार आहे. एका पाकिस्तानी मीडिया वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक या स्पर्धेत सहभागी देशांना पाठवण्यात आले आहे. तयारीव्यतिरिक्त, हे आयसीसी अधिकारी लॉजिस्टिकशी संबंधित तयारीचीही तपासणी करतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित एक कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये क्रिकेटपटूंसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला मंजुरी मिळू शकते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीचे काही अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानात पोहोचले होते. एकीकडे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी तयारी करत आहे तर दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत भारताची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
पाकिस्तानने आयसीसीला पाठवलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाईल आणि 10 मार्च हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे सामने कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथे होणार आहेत. फायनलसह 7 सामने लाहोरमध्ये खेळवले जातील, तर दोन्ही गटातील पहिले सामने आणि पहिला सेमीफायनल सामना कराचीमध्ये खेळवला जाईल. दुसरीकडे रावळपिंडीच्या मैदानावर दुसऱ्या सेमीफायनलसह 5 सामने खेळवले जाणार आहेत.
ICC Test Rankings 2024 : जडेजासह सुंदरची गोलंदाजी क्रमावारीत झेप तर आर. अश्विनची घसरण…
वेळापत्रकानुसार भारतीय संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. टीम इंडियाला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह अ गटात ठेवण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी, दुसरा सामना 23 फेब्रुवारीला न्यूझीलंडशी होईल आणि ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया आपला शेवटचा सामना 1 मार्चला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे स्पर्धेतील सहभागासाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय त्यासाठी भारत सरकारला घ्यावा लागेल. त्यानंतरच चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारतीय संघाच्या सहभागाचे चित्र स्पष्ट होईल.