दुबई -झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीकवर आयसीसीने 8 वर्षांसाठी बंदी घातली आहे. स्ट्रीकने भ्रष्टाचार रोखण्यासाठीच्या आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, त्याने आपण नियमभंग केल्याची कबुलीही दिली आहे.
झिम्बाब्वेच्या यशस्वी गोलंदाजांमध्ये गणला जात असलेल्या स्ट्रीकच्या वर्तनावर 2017 व 2018 या कालावधीत संशय व्यक्त केला जात होता. तसेच त्याने प्रशिक्षक म्हणूनही त्याच्यावर अनेक सामन्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. हे सामने आंतरराष्ट्रीय, आयपीएल, बांगलादेश प्रीमियर लीग व अफगाणिस्तान प्रीमियर लीग या स्पर्धेतील होते. स्ट्रीकने या आरोपांविरोधात दाद मागितली होती.
मात्र, अखेर त्याने आपली चूक कबूल केली. आता त्याच्यावर आठ वर्षांची बंदी लावण्यात आली असून, या काळात तो क्रिकेटशी कोणत्याही प्रकारे जोडला जाऊ शकत नाही, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
स्ट्रीकने 65 कसोटी व 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत. गोलंदाज म्हणून त्याने 216 कसोटी व 239 एकदिवसीय बळी मिळवले आहेत.
स्ट्रीकने कसोटीत 1 हजार 990, तर एकदिवसीय सामन्यात 2 हजार 942 धावा केल्या आहेत. 2005 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर केवळ कौंटी क्रिकेट खेळत असलेला स्ट्रीक इंग्लंडमधील वॉर्विकशायर क्रिकेट क्लबचा कर्णधार होता. 2016 सालच्या आयपीएलमध्ये स्ट्रीक गुजरात लायन्सचा, तर 2018 साली कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.