दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने आज इनामाची घोषणा केली आहे.
विश्वचषक विजेत्या संघाला यंदा तब्बल 40 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे किंमत 28 कोटींची असणार आहे. याचसोबत उप-विजेत्या संघाला 20 लाख डॉलर्सचं बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
विजेतेपदासाठी घोषणा करण्यात आलेली बक्षिसाची रक्कम ही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वाधिक रक्कम मानली जात आहे. याचसोबत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस घोषित करण्यात आले आहे.