Champions Trophy Tour 2024 : बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी टूरच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. बीसीसीआयने मुझफ्फराबाद, स्कार्डू आणि हुंजा काली येथे ट्रॉफी परेड आयोजित करण्यावर आक्षेप घेतला होता. आता या ठिकाणांच्या जागी आयसीसीने नवीन ठिकाणे जाहीर केली आहेत.
आयसीसी ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी ट्रॉफी टूरचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आक्षेपानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणार नाही. आयसीसीने पाकिस्तानचा पीओके प्लॅन रद्द केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा इस्लामाबाद येथून 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचे शेवटचे वेळापत्रक फक्त भारतासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर ट्रॉफी पुन्हा पाकिस्तानला जाईल.
Excitement for the upcoming Men’s Champions Trophy 2025 builds up, as the Trophy Tour kicks off in Islamabad 🎉https://t.co/QfQJesYVRf
— ICC (@ICC) November 16, 2024
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चॅम्पियन्स ट्रॉफी पीओकेमध्ये नेण्याची इच्छा होती. मात्र बीसीसीआयच्या आक्षेपानंतर त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. आता आयसीसीने ट्रॉफी टूरचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ट्राफी टूर 16 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि अशादिवशी म्हणजेच ट्रॉफी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी भारतात राहील.
चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात कधी पोहोचेल?
भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौराही निश्चित करण्यात आला आहे. ट्राफी 15 जानेवारीला भारतात येईल आणि 26 जानेवारीपर्यंत येथेच राहिल. आयसीसीने त्याचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. इस्लामाबादनंतर ट्रॉफी अबोटाबाद, मुरी, नाथिया गली आणि कराची येथे जाईल. यानंतर तो 26 ते 28 नोव्हेंबरपर्यंत अफगाणिस्तानमध्ये राहील.
अफगाणिस्ताननंतर चॅम्पियन्स ट्रॉफी बांगलादेशमध्ये जाणार आहे. येथे 10 ते 13 डिसेंबरपर्यंत राहिल. यानंतर 15 ते 22 डिसेंबरदरम्यान दक्षिण आफ्रिकेत तर 25 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियात राहील. यानंतर ट्राफी 6 ते 11 जानेवारीपर्यंत न्यूझीलंडमध्ये राहणार आहे. ट्रॉफी 12 ते 14 जानेवारी दरम्यान इंग्लंडमध्ये राहील. त्यानंतर ट्राफी भारतात पोहोचेल.
ट्रॉफी टूरचे संपूर्ण वेळापत्रक:
16 नोव्हेंबर – इस्लामाबाद, पाकिस्तान
17 नोव्हेंबर – तक्षशिला आणि खानपूर, पाकिस्तान
18 नोव्हेंबर – अबोटाबाद, पाकिस्तान
19 नोव्हेंबर- मुरी, पाकिस्तान
20 नोव्हेंबर- नाथिया गली, पाकिस्तान
22 – 25 नोव्हेंबर – कराची, पाकिस्तान
26 – 28 नोव्हेंबर – अफगाणिस्तान
10 – 13 डिसेंबर – बांगलादेश
15 – 22 डिसेंबर – दक्षिण आफ्रिका
25 डिसेंबर ते 5 जानेवारी – ऑस्ट्रेलिया
6 – 11 जानेवारी – न्यूझीलंड
12 – 14 जानेवारी – इंग्लंड
15 – 26 जानेवारी – भारत
27 जानेवारी – स्पर्धेची सुरुवात ठिकाण – पाकिस्तान