पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीइटी) गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेला आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी फेटाळला.
“खोडवेकर हा तत्कालिन परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रितेश देशमुख यांच्या संपर्कात होता. याबाबत चॅटिंग मिळाले आहे. यात त्याचा त्याचा आर्थिक फायदा झाला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रभावशाली पदावर त्याने काम केले आहे. जामीन मिळाल्यास तो तपासात ढवळाढवळ करू शकतो, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. हे समाज विघातक कृत्य आहे. याचा विचार करून जामीन फेटाळावा,’ अशी मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
टीईटी 2019-20 मध्ये गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणात खोडवेकर याला पोलिसांनी अटक केली होती. सुरूवातीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर करोनाची लागण झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सुरूवातीला तात्पुरता जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला. तो अर्जही फेटाळण्यात आला.