पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर मनोरमा खेडकरांनी जामीन अर्ज केला. मात्र हा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत.
येरवडा कारागृहात होणार रवानगी
मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसऱ्यांदा देखील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार आहे.
सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद
मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला असून त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे.