लंडन – एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत कर्णधार म्हणून अफलातून कामगिरी करत विजेतेपद मिळवून देणारा इयान मॉर्गन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 साली पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
निवृत्तीचा निर्णय जाहिर करताना मॉर्गनने सहकारी खेळाडू, प्रशिक्षक व चाहत्यांचे आभार मानले आहे. मॉर्गनने 225 एकदिवसीय सामन्यात 6,957 धावा केल्या असून त्यात 13 शतकांचा समावेश आहे. त्याने 126 सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यात 76 सामन्यात संघाने विजय मिळवला.
त्याने इंग्लंडचे 72 टी 20 सामन्यांत नेतृत्व करताना सर्वाधिक टी 20 सामन्यात नेतृत्व करण्याच्या महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीला मागे टाकले. धोनीने 115 टी 20 सामन्यात 2,458 धावा केल्या आहेत. याचबरोबर तो 16 कसोटी सामने देखील खेळला आहे. यात त्याने दोन शतके फटकावली आहेत.