नवी दिल्ली – कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनवर मुंबईत चेन्नई सुपर किंग्ज विरोधात झालेल्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॉर्गनला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यंदाच्या मोसमात स्लो ओव्हर-रेटचा फटका सहन करणारा एम. एस. धोनी आणि रोहित शर्मानंतर इयान मॉर्गन तिसरा कर्णधार ठरला आहे.
आयपीएलच्या आचारसंहिता अंतर्गत मोसमात कमीतकमी ओव्हर रेटच्या गुन्ह्यांबाबत हा मोसमाचा पहिलाच अपराध असल्याने मॉर्गन यांना 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या स्लो ओव्हर-रेटच्या नियमानुसार पहिल्यांदा नियमांचा भंग केल्यास दंड 12 लाख रुपये आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दंड दुप्पट, 24 लाख रुपये करण्यात आला आहे. इतकंच नाही तर कर्णधाराबरोबरच प्लेइंग इलेव्हनच्या प्रत्येक सदस्यालाही या गुन्ह्यादरम्यान मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय, एकाच मोसमात तिसऱ्यांदा नियम मोडल्यास कर्णधारावर सामना बंदी घालत आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो.
दरम्यान, सलग तिसऱ्या पराभवानंतर मॉर्गनच्या नाईट रायडर्सचा पुढील सामना 24 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरोधात होणार आहे. हा सामनादेखील संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. यापूर्वी त्यांचा तडाखेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल फॉर्ममध्ये परतला आहे. चेन्नईविरोधात संघ अडचणीत असताना रसेलने चौकार-षटकारांची बरसात करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या.