नवी दिल्ली – बोईंग कंपनीला भारताला “एफ-15 ईएक्स’ फायटर विमान विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकन सरकारकडून आम्हाला “एफ-15 ईएक्स’ फायटर विमान इंडियन एअर फोर्सला विकण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती बोईंगकडून देण्यात आली. बोईंग ही अमेरिकेतील आघाडीची विमान उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने बनवलेल्या काही विमानांचा भारतीय सैन्य दलांमध्ये वापर सुरु आहे.
“एफ-15 ईएक्स’च्या रुपाने आयएएफला सुसज्ज आणि बहुउद्देशीय फायटर विमान मिळणार आहे. शस्त्रास्त्र वाहून नेणे आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे विमान अद्वितीय आहे, अशी माहिती अंकुर कांगलेकर यांनी दिली. ते बोईंग डिफेन्स अँड स्पेस इन इंडिया फायटर सेल्सचे प्रमुख आहेत. “एफ-15 ईएक्स’ विमानांसाठी बोईंगला अमेरिकन सरकारकडून मार्केटिंगचा परवाना मिळाला आहे. त्यामुळे भारताला विमानांचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“एफ-15 ईएक्स’हे नवीन बदल असलेले अत्याधुनिक फायटर विमान आहे. हे बहुउद्देशीय फायटर विमान सर्व प्रकारच्या वातावरणात तसेच दिवस-रात्री मोहिमा पार पाडण्यासाठी सक्षम आहे.
दरम्यान, भारत आणि अमेरिकेमध्ये मध्यंतरी ऐतिहासिक बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन ऍग्रीमेंट करार झाला होता. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून काही महत्त्वाची फायटर विमाने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
13 टन शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता
“एफ-15ईएक्स’मध्ये 36 टनापर्यंत वजन उचलून उड्डाण करण्याची क्षमता आहे. भारताचे मुख्य अस्त्र सुखोई-30 एमकेआयमध्ये सुद्धा इतकीच क्षमता आहे. बोईंगच्या दाव्यानुसार एफ-15ईएक्स 13 टनापर्यंत शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकते.
या विमानातील अत्याधुनिक दिशादर्शक प्रणालीमुळ जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करता येऊ शकतो. “एफ-15ईएक्स’मध्ये हवेतून हवेत हल्ला करणारी 22 मिसाइल्स डागण्याची क्षमता आहे. “एफ-15ईएक्स’ मध्ये एफ-35 या स्टेल्थ फायटर जेटपेक्षाही जास्त मिसाइल्स वाहून नेण्याची क्षमता आहे.