माद्रिद – करोनाचा धोका असला तरी आता जर स्पर्धा आयोजित करण्याची आयोजकांची तयारी असेल तर त्यात सहभागी होण्यासाठी प्रसंगी धोका पत्करण्याचीही माझी तयारी असल्याचे जागतिक स्तरावरील अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने म्हटले आहे.
करोनाने स्पेनमध्ये प्रचंड हानी केली होती. आता हा धोका खूपच कमी झाला असून त्यामुळेच विविध स्पर्धा सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. येथील सर्वात प्रतिष्ठेची ला लिगा फुटबॉल स्पर्धा येत्या जून महिन्यापासून सुरु करण्याची तयारी आयोजकांनी दाखवली होती. त्यावरच मेस्सीने आपले मत मांडले आहे. या
स्पर्धेत रेयाल माद्रिदला दोन गुणांनी मागे टाकत मेस्सीच्या बार्सिलोना क्लबने या स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखले आहे. गेल्या मोसमात मेस्सीच्याच कामगिरीच्या जोरावर क्लबने सातत्यपूर्ण खेळ केला होता. त्यातच करोनाचा धोका कमी झाल्याने येथील अनेक क्लबच्या खेळाडूंनी मैदानात वैयक्तिक पातळीवर सरावदेखील सुरु केला आहे. मेस्सीनेही या सरावात सहभाग घेतला होता.
करोनाचा धोका आहे हे मला देखील समजते. मात्र, आता हा धोका कमी झाला आहे. त्यामुळे जर सुरक्षेचे सर्व संकेत पाळले जात सराव केला तर खेळाडूंची मानसिकता देखील सकारात्मक होईल याच उद्देशाने मी काही दिवसांपासून सराव सुरु केला आहे. आता संकटाला घाबरुन जाण्यापेक्षा प्रसंगी धोका पत्करण्याची देखील माझी तयारी आहे. मात्र, आता लवकरात लवकर स्पर्धा सुरु होणे क्रीडाक्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे, असेही मेस्सीने सांगितले.