तुमच्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभा राहीन

शेखर गोरे; म्हसवडला महिला मतदारांशी साधला संवाद

गोंदवले  – तुम्ही ज्या पद्धतीने सख्ख्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहता, तसेच सर्व माता-भगिनींनी माझ्याही पाठीशी खंबीर राहून एक वेळ निवडून द्यावे. महिलांना उपयुक्त असलेले उद्योग उभारुन तुमच्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभा राहीन, अशी ग्वाही शिवसेनेचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शेखर गोरे यांनी म्हसवड येथे मतदारांच्या भेटीदरम्यान केले.

शेखर गोरे यांनी म्हसवडचे ग्रामदैवत सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. ते म्हणाले, दहा वर्षे आमदार म्हणून राहिलेल्यांना पालिकेची सत्ता असताना मंदिर परिसरातील विकास दिसला नाही.

पालिका निवडणुकीत बहुमतात सत्ता आल्याशिवाय गुलाल कपाळी लावणार नाही, असे म्हणणाऱ्याला अखेर नाथ महाराजांनी गुलाल दिलाच नाही. गुलाल अंगावर न पडल्याच्या रागातून चार वर्षांत एकदाही मंदिरात पाय न ठेवणारे आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी नाथ महाराजांना साकडे घालण्यासाठी मंदिरात येतील. त्यांच्यापासून सावध रहा.

शेखर गोरे यांनी बचत गटांच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. माझी बांधिलकी प्रथम जनतेशी आहे. गेली दहा वर्षे माण तालुक्‍यात विकासकामे करण्यासाठी शासकीय निधीची वाट पाहिली नाही. मी स्वखर्चातून विकासकामे केली आहेत. विकासाच्या नावावर तालुक्‍यातील जनतेला आजपर्यंत झुलवणाऱ्यांना घरी बसवा. तालुक्‍यात महिला व तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काम केले. पहिल्यापासून 20 टक्‍के व 80 टक्‍के समाजकारण, हे धोरण आहे.

म्हसवडकरांनी मला नेहमीच साथ दिली असून यावेळीही तुमच्या भाऊला विजयी करुन या तालुक्‍याला हक्‍काचा आमदार द्या. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, उपतालुकाप्रमुख शिवदास केवटे, गणेश रसाळ, नगरसेवक धनाजी माने, शहरप्रमुख राहुल मंगरूळे, मुन्ना काझी, आनंद बाबर, संजय टाकणे, दत्तात्रय रोकडे, कैलास भोरे, सोमनाथ कवी चंद्रकांत गुरव, मुन्ना काझी, गणेश रसाळ, अनिल कांबळे, संतोष शेटे, धोंडिराम साळुंखे व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.