कसोटीत स्वतःला सिद्ध करेन- अदिल रशीद

टीकाकारांपेक्षा इंग्लंडच्या निवड समितीवर विश्‍वास

लंडन – भारताविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली असून वन-डे मालिकेत चांगली कामगिरी करणारा लेगस्पिनर अदिल रशीदला या संघात स्थान देण्यात आले आहे. रशीदच्या निवडीवर इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. तसेच मायकेल वॉनसारख्या माजी कर्णधारांनी रशीदची निवड चुकीची असल्याचे थेट विधान केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या टीकेचा खरपूस समाचार घेतानाच वॉनचे हे विधान मूर्खपणाचे असून आगामी कसोटी मालिकेत मी आपल्या कामगिरीने स्वतःला सिद्ध करुन दाखवेन, असे आव्हान अदिल रशीदने आपल्या टीकाकारांना दिले आहे. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेमध्ये रशीदने प्रभावी कामगिरी केली होती. त्याने पहिल्या वन-डे सामन्यांत एक, दुसऱ्यात दोन आणि तिसऱ्या वन-डे लढतीत तीन विकेट घेतल्या होत्या. तसेच तिसऱ्या वन डे सामन्यांत त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडविला होता. कोहलीनेही रशीदच्या “त्या’ चेंडूचे कौतुक केले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

मात्र, रशीद डिसेंबर 2016 नंतर एकाही कसोटी सामन्यात खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवडीवर टीका करताना रशीदची निवड करणे म्हणजे संघाचा मूर्खपणा असून ज्या खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारची रुची नाही आणि त्याने अशा प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे, त्याची निवड करून थेट कसोटी संघात स्थान देणे हास्यास्पद असल्याचे ट्‌विट इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले होते. तसेच यॉर्कशायर कौंटी क्‍लबचे प्रमुख मार्क ऑर्थर यांनी देखील अदिल रशीदच्या निवडीबाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.

अदिल रशीद गेल्या चार दिवसीय कौंटी हंगामात खेळला नव्हता, असे सांगताना त्यांनी त्याच्या निवडीवर टीका केली आहे. मायकेल वॉनच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रशीद म्हणाला की, त्याला वाटते की लोक त्याचे ऐकतात. मात्र योग्य ठिकाणी बसलेल्या व्यक्‍ती त्याच्या मताला कोणत्याही प्रकारचे महत्त्व देत नाहीत, असे आता सिद्ध झाले आहे. जेव्हा मी माझ्या निवृत्तीची घोषणा केली होती, त्या वेळीही त्याने अशाच प्रकारचे ट्‌विट करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माझी कामगिरी अशांच्या टीकेवर अवलंबून नाही आणि मी ही बाब पुरेशी सिद्ध केली आहे.

त्याआधी रशीदने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करायचे आहे, असे म्हणत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, एकदिवसीय मालिकेत भारताच्या अव्वल फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यात रशीद यशस्वी ठरल्यामुळे त्याला इंग्लंडच्या कसोटी संघातही स्थान देण्यात आले. रशीदला अंतिम संघात स्थान मिळाल्यास त्याची ही मायदेशातील पहिली कसोटी असेल.
रशीदची चमकदार कामगिरी

रशीदने आपल्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्व दहाही कसोटी सामने परदेशी भूमीवर खेळले आहेत. त्याने 2014मध्ये भारताविरुद्ध 19 बळी मिळविले होते. रशीदची एकंदर कामगिरी पाहता त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 42.78 सरासरीने 38 बळी घेतले आहेत. त्यात डावांत 4 बळी पाच वेळा, तर पाच बळी एकदा घेतले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रशीदने 73 वन डे सामन्यांत 30.80 सरासरीने 113 बळी घेतले असून 32 टी-20 सामन्यांमध्ये 28.82 सरासरीने 28 बळी टिपले आहेत. रशीदने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2009 मध्येच पदार्पण केले असले, तरी कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाटी 2015 हे वर्ष उजाडावे लागले. इंग्लंड संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगात अव्वल स्थानावर असला, तरी कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडची कामगिरी अगदीच सामान्य आहे. गेल्या तीन कसोटी मालिकांमध्ये त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. मग मालिका विजय. दूरच राहिला. त्यामुळेच मायदेशातील कसोटी मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडने कंबर कसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)