वक्तव्यामुळे झाला ट्रोल
नवी दिल्ली – माझ्या तंदुरुस्तीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी करोनाला घाबरत नाही. मलाही हा संसर्ग होऊ शकतो हेदेखील मला माहीत आहे, मात्र, स्पर्धेत खेळताना जर मला याची बाधा झाल्याचे सिद्ध झाले तरीही मी माघार घेणार नाही, अशा शब्दांत शिखऱ धवनने आपला आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्धार व्यक्त केला. अर्थात, त्याच्या या वक्तव्यावर त्याला क्रिकेटप्रेमींनी चांगलेच ट्रोल केले आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी अमिरातीत आम्ही सगळे दाखल झाल्यापासून आमची 9 वेळा करोना चाचणी झाली आहे. त्यात सगळ्यांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सध्यातरी करोनाची भीती गेली आहे. त्यातही जरी बाधा झाल्याचे सिद्ध झाले तर आवश्यक ती सर्व काळजी घेत व सूचनांचे तसेच नियमांचे तंतोतंत पालन करून ही स्पर्धा खेळेन पण स्पर्धेतून माघार घेणार नाही, असेही धवन म्हणाला.
बाधा झाल्यावर कळेल
अमिरातीत करोनाचा धोका कमी असला तरीही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे दिसत असलेल्या धोक्यासमोर आपण सज्ज राहू शकतो. मात्र, करोनाचा विषाणू दिसत नसल्याने जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. तुझा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा निश्चितच आहे, पण बाधा झाली तर बाजूला होणे गरजेचे आहे म्हणजे अन्य सर्वांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, अशा शब्दांत धवनच्या वक्तव्यांचा समाचार सोशल मीडियावर घेण्यात आला आहे.