नवी दिल्ली : माझ्यासारखीच माझी मुलगी देखील सार्वजनिक क्षेत्रात आहे. ती भाजपाच्या अनेक सभांना हजर असते. तिची इच्छा असेल तर तिने तिकीटाची मागणी पक्षाकडे करावी. मी तिच्या तिकिटासाठी प्रयत्न करणार नाही. तिकिटासाठी तिने स्वतः प्रयत्न करावेत, असे म्हणताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया भोकर विधानसभा मतदार संघातून इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याअनुसार श्रीजया यांनी या मतदार संघात गाठीभेटी देखील सुरु केल्या आहेत. यापूर्वी अशोक चव्हाण यांनी देखील भोकर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. गेल्या अनेक दशकांपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मात्र, त्यावेळी अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते. हा मतदारसंघ नांदेड लोकसभेत येत असून यावेळी भाजपचा उमेदवार या लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाला होता.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांची कन्या असलेल्या श्रीजया यांनी या मतदारसंघासाठी जोर लावला आहे. त्यादूर्ष्टीकोनातून उमेदवारांची चाचपणी देखील करण्यात आली होती. यावेळी श्रीजया यांना भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या दिसून येत आहे.
या विषयावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, स्वतःच्या भविष्याचा विचार तिनेच करायचा आहे.तिला कोणत्या मतदारसंघातून तिकीट द्यायचे या पक्षाचा निर्णय आहे. यात माझा कोणताही हस्तक्षेप असणार नाही. अनेक वर्षांपासून ती देखील काम करत आहे. एका वडील म्हणून तिने राजकारणात यावं अशी माझी इच्छा असली तरी निर्णय मात्र सर्वस्वी तिचाच असणार आहे.