मुंबई: राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा लाचखोराची बायको म्हणून उल्लेख केल्यामुळे चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शेख यांच्यावर पुन्हा एकदा पलटवार करत ‘मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याचं मुलं म्हणून हिणवणार नाही’, असा घणाघात वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करून हा पलटवार केला आहे. मला व माझ्या परिवारासाठी गलिच्छ भाषा वापरली जात आहे. तरी ही मी कुणा परिवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही. कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही, असा हल्लाबोल वाघ यांनी केला आहे.
विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातं. पण मला हे करण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत. मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं… या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना. अन्यायाविरोधात पेटून उठा, असं आवाहन करतानाच मी तुमच्यासोबत आहे. मी आवाज उठवत आहे आणि उठवत रहाणारचं, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मला व माझ्या परीवारासाठी गलीच्छ भाषा वापरली जातीये तरी ही..
मी कुणा परीवारातील सदस्यांना बलात्कार्याची बायको बलात्कार्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही
कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही
विरोधकांकडे मुद्दे संपले कि तिच्या बाईपणाला व तिच्या परीवाराला टार्गेट केलं जात
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 8, 2021
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिले होते.
“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक बाचाबाची सुरु झाली आहे. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांवर दोघेही उत्तर देत आहेत.