पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणुकांच्या तोंडावर आपण इतर मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा जाणीवपूर्क पसरवली जात आहे. पण, पर्वतीत मागील १५ वर्षे मी नियाेजनबद्ध काम केले आहे. मतदारांनी साथ दिल्याने पायाभूत सुविधा निर्मितीसाेबत विकसित मतदारसंघ म्हणून पर्वतीकडे पाहिले जाते.
त्यामुळे आपण याच मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहोत, असा दावा आमदार माधुरी मिसाळ यांनी केला. दरम्यान, यातून त्यांनी कसब्यातून लढण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.
पत्रकारांशी बोलताना मिसाळ म्हणाल्या, “पाणीपुरवठा, रस्ते, विजेच्या समस्यांतून नागरिकांची सुटका होण्यासाठी चांगले काम करता आले. स्वारगेट, सिंहगड रस्ता येथील उड्डाणपुलांमुळे वाहतूक काेंडी कमी झाली.
नदीपात्रातील रस्त्यालाही मंजुरी मिळाली आहे. स्वारगेट येथील मल्टीमाॅडल हब मेट्राेच्या माध्यमातून तयार हाेत आहे. त्याद्वारे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्रित जाेडण्यात येत आहे.
स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्राे प्रकल्पास मंजुरी मिळून त्याचे भूमिपूजन झाले आहे. बिबवेवाडीत ५०० बेडचे माेठे रुग्णालय उभारले जात आहे. त्यापैकी १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यत आले आहे.’ मतदारांच्या विश्वासामुळेच आपण गेली १५ वर्षे आमदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इच्छूक असणे गैर नाही
विधानसभेसाठी पर्वती मतदारसंघातून अनेक जण इच्छूक आहेत. त्यात महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनीही प्रचाराला सुरूवात केली आहे. याबाबत विचारले असता मिसाळ म्हणाल्या, “विधानसभेसाठी इच्छूक असणे काहीच गैर नाही.
आमच्यात कोणतेही वाद नाहीत. मी आजही माझ्या कार्यक्रमांचे निमंत्रण भिमाले यांना देते. मात्र, ते कोणत्याही कार्यक्रमासाठी मला बोलवत नाहीत. मी केलेल्या कामावर मला विश्वास असून इच्छूकांच्या भूमिकेचा निवडणूकीवर परिणाम पडणार नाही.
या पूर्वीही अनेकजण इच्छूक होते. त्यानंतरही मी निवडून आले आहे. तसेच पक्षाने कोणालाही तिकीट दिले, तरी आम्ही पक्ष म्हणून त्या उमेदवाराचे काम करू,’ असेही मिसाळ म्हणाल्या.