मुख्यमंत्री म्हणून मी परत येईन – फडणवीस

मुंबई – ‘मुख्यमंत्री म्हणून गेल्या पाच वर्षांत काम करताना अनेक अडचणी आल्या, आव्हाने निर्माण झाली. पण त्यापासून कधीच पळालो नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आणि सकारात्मकपणे प्रश्‍न सोडवले. महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्वी ठरलो,’ असे सांगतानाच “पुढच्या सरकारमध्येही मी पुन्हा येईल. याच निर्धाराने, याच भूमिकेत, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, असे काव्यात्मक पंक्तीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी मंत्र्यांवर केलेले आरोप फेटाळून लावत त्यांची पाठराखण केली. महिला व बालविकास मंत्रालयावर झालेल्या मोबाइल घोटाळ्याचा आरोपावर स्पष्टीकरण दिल्यानंतर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपाला जोरदार उत्तर दिले. “मागील चार-पाच वर्षांत मंत्री म्हणून चंद्रकांत दादांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे आलेला माणून निराश होऊन परत गेलेला नाही. एखादा निर्णय कुणाचाही चुकू शकतो. गेली 30-35 वर्षे त्यांना पाहतोय, पण दुर्भावनेने त्यांनी काही केलेले नाही,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ईव्हीएमप्रकरणी खडे बोल
अंतिम आठवडा प्रस्तावावर अनेकांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. “अजितदादांचं भाषण ऐकलं असतं तर जयंत पाटील, आव्हाडांनी हा मुद्दा मांडला नसता. अजितदादांनी पक्षाच्या शिबिरात सांगितलं की ईव्हीएमला दोष देऊ नका. त्यामध्ये काही नाही.’ “ईव्हीएम 2004, 2009 मध्ये होते तेव्हाही मनमोहन सिंग निवडून आले. या आधी विधानसभा निवडणूकीत तीन राज्यांत कॉंग्रेस सरकार आले. एवढेच नव्हे तर आता सुप्रिया सुळेही निवडून आल्या. तुम्ही सत्य स्वीकारलं नाहीत तर तिथेच बसावं लागेल. आपण जनतेपासून दुरावलो. मोदींजींवर आरोप केले हे सत्य स्वीकारलं नाही तर तिथेच बसावं लागेल,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.