मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठीच सत्ताधारी पक्षात गेलो

सातबारावरील बोजाचा विषय मार्गी लावणार

जावळी तालुक्‍यातील देवस्थान जमिनींच्या सातबाऱ्यावरील शिक्‍क्‍याचा विषय मी आणि शिवेंद्रराजे एकत्र बसून मिटवण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेल्या निवडणूक प्रचारात हे शिक्‍के काढण्याचे आश्‍वासन मी दिले होते. मात्र, तीन महिन्यात राजीनामा दिल्याने हा विषय मिटवता आला नाही. आता निवडणूक झाल्यावर हा विषय मिटवण्यासाठी संबंधित गावात कमिटी नेमण्यात येईल, असे उदयनराजे म्हणाले.

सातारा  – सातारा व जावळी तालुक्‍यातील जनतेचे आणि माझे अतूट नाते आहे. मतदारसंघाच्या विकासासाठीच मी सत्ताधारी पक्षात गेलो आहे. आई-वडिलांचे छत्र हरपले तरी सातारा-जावळीतील जनतेने माझ्यावर पुत्रवत प्रेम केले आहे. जनतेच्या कायम ऋणात राहणार आहे, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेढा येथे झालेल्या मेळाव्यात शिवेंद्रराजे बोलत होते.

उदयनराजे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिक्षण समितीचे माजी सभापती अमित कदम, जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना रांजणे, नगराध्यक्ष सौ. द्रौपदा मुकणे, एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ, रिपाइं तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, ज्ञानदेव रांजणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, सुनील काटकर, बाळासाहेब गोसावी, सयाजी शिंदे, रवी परामणे, योगेश गोळे, सौ. कविता धनवडे, विकास देशपांडे, विजय शेलार, सचिन जवळ, रामभाऊ शेलार, सौ. जयश्री पवार, कांतीभाई देशमुख, शिवाजीराव मर्ढेकर, मोहनराव कासुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवेंद्रराजे म्हणाले, जावळी तालुक्‍यातील प्रत्येक वाडीवस्तीमध्ये विकासकामे पोहोचवली आहेत. बोंडारवाडी धरणाला मंजुरी मिळाली असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास कटिबद्ध आहे. कुसुंबी मार्गे मेढा भाग कोयनेशी जोडल्याने लोकांचा दळणवळणाचा प्रश्‍न सुटला आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, युवकांच्या आर्थिक उन्नतीसाठी जावळीत अनेक उद्योग प्रकल्प होणे गरजेचे आहे. यासाठी शिवेंद्रसिंहराजेंसारखे नेतृत्व मिळाले आहे. या गतिमान नेतृत्वामुळे मतदारसंघाचा अधिक विकास झाला आहे. तुमच्यामुळे आम्ही आहोत, याची जाण आहे. आम्ही दोघे भविष्यात राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन कामे करणार आहोत.

सदाशिव सपकाळ म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी बाबाराजेंनी पक्ष बदलाची घेतलेली भूमिका योग्य आहे. दरम्यान, दोन्ही राजांच्या प्रचारार्थ ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतषबाजीत रॅली काढण्यात आली. जावळीकरांनी दोन्ही राजांना मताधिक्‍याने विजयी करण्याचा निर्धार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.