अहमदनगर : घरासमोर बिबट्यांची झुंज पाहून उडाला थरकाप

खानापूर येथील घटना; जखमी बिबट्या शिरला गोठ्यात
श्रीरामपूर (प्रतिनिधी) –
तालुक्‍यातील खानापूर येथे दोन बिबट्यांत चांगलीच झुंज झाली. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या काळाजाचा चांगलाच थरकाप उडाला. यातील एक बिबट्या गंभीर जखमी झाला. तो एका शेतकऱ्याचच्या शेडमध्ये आश्रयास आला. हा प्रकार आज पहाटेच्या सुमारास घडला.

आजपर्यंत बिबट्याने माणसे, शेळ्या, कुत्री यांच्यावर हल्ले केले आहेत. मात्र आज खानापूर येथील हरिभाऊ भानुदास आदिक यांच्या वस्तीवर चक्क बिबट्यानेच बिबट्यावरच हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.26) पहाटे घडली. या झुंजीत एका बिबट्याने दुसऱ्याच्या डोक्‍यावर पंजाचा जोरदार प्रहार केला. त्यामुळे दुसरा बिबट्या रक्त भंबाळ होऊन खाली पडला.

अचानक बिबट्यांची सुरू झालेली झुंज पाहून वस्तीवरील ग्रामस्थांच्या काळजाचा थरकार उडाला. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या आरडाओरडीने एक बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला, तर दुसरा बिबट्या आदिक यांच्या शेडमध्ये घुसला. त्यानंतर काही क्षणातच तो बेशुद्ध पडला. या घटनेनंतर आदिक यांनी तातडीने थोरले बंधू कचरू पाटील आदिक यांच्यासह पोलीस पाटील संजय आदिक यांना मोबाइलवरून या घटनेची माहिती दिली.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी जखमी बिबट्यास पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनपाल बी. एस. गाढे, बी. बी. सुरासे, एस. एम. लांडे, वनमित्र शरद आसने आदिव वस्तीवर आले. त्यांनी जखमी बिबट्यास श्रीरामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. वरिष्ठांच्या आदेशानुसार या बिबट्याला उपचारासाठी नगरला पाठविण्यात येणार आहे. खानापूर शिवारात ग्रामस्थांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. मात्र दोन बिबट्यांची झुंज अनुभवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांती भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदिक वस्तीवर तत्काळ पिंजरा लावणार
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन वनपाल व वनरक्षकांशी चर्चा केली. तसेच उपवनसंरक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क करून दुसरा बिबट्या जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. यावेळी या परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा आदिक यांना दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.