मुंबई – मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला. याचे मुख्य कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे त्याचा फिटनेस.
वयाच्या 54 व्या वर्षी आपल्या फिटनेसमुळे सर्वाधिक चर्चेत असणारा हा अभिनेता मॉडेलिंग क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. याशिवाय हा अभिनेता त्याच्या रिलेशनशिप स्टेटमुळे खूप चर्चेत असतो. हा अभिनेता आहे मिलिंद सोमण. मिलिंदनं नुकतंच ‘मेड इन इंडिया : अ मेम्योर’ हे त्याचं पुस्तक प्रकाशित केलं.
दरम्यान, मिलिंदच्या या पुस्तकात त्यानं त्याच्या आयुष्यातील अनेक माहित नसलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे. याशिवाय बॉलिवूड किंवा मॉडेलिंग क्षेत्रात येण्याआधी मिलिंद RSS शाखेचा सदस्य होता. हेही त्यानं या पुस्तकात सांगितलं आहे.
मिलिंद सोमणनं त्याचं हे पुस्तक ‘रुपा राय’ यांच्यासोबत मिळून लिहिलं आहे. या पुस्तकात त्याच्या आयुष्यातील माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
मी तरुणपणी आरएसएसच्या शाखेला जात होतो. माझ्या वडिलांना वाटत असे की त्या ठिकाणी तरुण मुलांना शिस्त लागते. फिटनेस चांगला राहतो तसेच सारासार विचार करण्याची सवय लागते. आमच्या आजूबाजूचे अनेक तरुण त्यावेळी यात जोडले गेले होते. त्यामुळे माझ्या घरच्यांनीही मला तिकडे पाठवलं. पण मला तिथे जायचं नसल्यानं मी लपून राहत असे. यामुळे माझे वडील माझ्यावर रागवत.
मिलिंद पुढे म्हणाला, ‘जेव्हा आज मी आरएएसबद्दल बातम्या वाचतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं. त्यांच्याबद्दल विध्वंसक आणि सांप्रदायिक प्रपोगंडा सेट करण्याचा आरोप केला जातो. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं. कारण जेव्हा मी या शाखेत जात असे, तेव्हा आमची वेळ संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंतची होती. त्यावेळी खाकी रंगाच्या शॉर्ट पॅन्टमध्ये आम्ही मिरवणुका काढत असू, योगा करत असू, व्यायामाच्या पारंपरिक साधनांचा वापर करुन व्यायाम करत असू, त्याचवेळी गाणी गात असू संस्कृत श्लोक म्हणत असू कधी कधी त्यांचे अर्थही आम्हाला माहित नसत.’