मुंबई : आपल्या मंजुळ स्वरांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच क्षेत्रातील मंडळींनी घेतले. यावेळी सर्वांनी साश्रू नयनांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. लताजींना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले असले तरी अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे. शाहरुख खानने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली, मात्र काही लोक शाहरुखच्या श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दोघेही लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र स्टेजवर चढले होते. मॅनेजर पूजा ददलानी हात जोडून तिथे उभ्या राहिल्या, तर शाहरुख खानने प्रथम तिथे उभे राहून प्रार्थना केली, त्यानंतर मास्क खाली सरकवून त्याने खाली वाकून पार्थिव शरीरावर फुंकर मारली. यानंतर शाहरुख खान पूजा ददलानीसोबत हात जोडून शरीराची प्रदक्षिणा करून स्टेजवरून खाली उतरला.
थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं।इस सभ्यता,संस्कृति को #भारत कहते हैं।
प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता।
भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें
“ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान,
सारा जग तेरी सन्तान”
(आज का दिन तो छोड़ देतें🙏🏻) https://t.co/fjmUWor9Fh pic.twitter.com/c6tkhiEK1d— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 6, 2022
शाहरुखच्या या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहरुख लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. हजारोंच्या गर्दीत अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या पार्थिवावर थुंकणे कसे शक्य आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. वास्तविक, शाहरुखने दुआचे पठण केल्यानंतर फुंकर मारली होती. मात्र आता यावरुन नवा वाद सुरु झाला आहे.
शाहरुखला या प्रकारावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांकडून काहीतरी शिकायला हवे होते, असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. याला थुंकणे म्हणतात का? असे ट्विट करत एका युजरने शाहरुखचा फोटो पोस्ट केला आहे. त्याला उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर दिले आहे.
“याला थुंकणे नाही, फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते. भारत मातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता,” असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.