मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांची आज 21 मार्च रोजी राज्यभर तिथीने जयंती साजरी केली जात आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुद्धा शिवजयंतीची जोरदार तयारी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती जोरात आणि उत्साहात साजरी करावी असं सांगितलं होत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत शिवाजी पार्कमध्येही शिवजयंती साजरी केली जात आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. या दरम्यान राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना एक शपथ देखील दिली.
राज ठाकरेंनी दिलेली शपथ…….
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा !#शिवजयंती #MNSAdhikrut pic.twitter.com/HJHLBmsXIf
— Raj Thackeray (@RajThackeray) March 21, 2022
“आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नाची पराकाष्टा करू. हे स्वराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, महिलांचा आत्मसन्मान राहिलं,
युवकांना रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुलं शाळेत जाऊन शिकत असेल, नागरिकांना आरोग्य व्यवस्था मिळेल, इथली शहर, गावं, तांडे सुंदर व सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, आमच्या शेतकरी बंधु- भगिनींना शेतमालाल भाव मिळेल, यासाठी जे पडेल ते करू छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचे स्वप्न आम्हाला दिलं आहे.
याचे स्मरण ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करु. आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो महाराष्ट्र धर्मासाठी एकनिष्ठतेसाठी व्यक्त करतो’.