मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी आली नसल्याचे कारण दिले. पण आता दलित नेते राजरत्न आंबेडकर यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे. आम्ही मनोज जरांगे यांना अगोदरच उमेदवारांची यादी दिली होती. पण त्यानंतरही त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, असे ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी रविवारी रात्री राज्यातील विधानसभेच्या काही जागा लढवण्याची घोषणा केली. पण सोमवारी सकाळी त्यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यात एकच खळबळ माजली. जरांगे यांनी आपण आपल्या मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी वेळेत न मिळाल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. आता भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे.
राजरत्न आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. आम्ही त्यांच्या निर्णयाचा सन्मान करतो. निवडणूक लढवायची किंवा नाही हा त्यांचा निर्णय होता. आम्ही त्यांना याविषयीचे सर्वाधिकार दिले होते. आम्ही त्याविरोधात जाणार नाही. पण जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचे जे कारण दिले, त्यामुळे मराठा, दलित, बौद्ध व मुस्लिमांत एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
ही संभ्रमावस्था दूर करणे ही माझी जबाबदारी आहे. कारण, आमच्यासाठी सामाजिक ऐक्य हे महत्त्वाचे आहे. राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या मनात कोणताही भ्रम राहू नये कोणताही द्वेष राहू नये यासाठी मी हे सांगत आहे. निवडणूक न लढवायची की नाही हा निर्णय पूर्णतः मनोज जरांगे यांचा आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करतो. पण उमेदवारांची यादी न मिळणे हे निवडणूक न लढवण्याचे कारण नाही. आता मनोज जरांगे यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? हे मला माहिती नाही.