घरातच राहण्याचे आवाहन सोशल मीडियावरून फिरताहेत संदेश
पिंपरी – दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जनतेमध्येही आता चांगली जनजागृती होवू लागली आहे. त्यासाठी काही संघटनांनी घरात बसूनच आता पुढाकार घ्यायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून करोनाच्या विरोधात शहरामध्ये “मी पिंपरी-चिंचवडकर’ मोहीम राबविली जात आहे. “प्रशासनाला सहकार्य करणार, करोनाला हद्दपार करणार’ ही टॅगलाईन घेवून ही मोहिम राबविली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात व देशात करोनामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे नागरिकांना घरातच बसण्याची वेळ आली आहे. मात्र सर्वांपासून अलिप्त राहणे आणि स्वत:ची काळजी घेणे हे दोन प्रमुख उपाययोजना प्रत्येकाने केल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत शासनाकडून तसेच महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे.
सुरुवातीला करोनाला गांभीर्याने न घेणारेही आता या विषाणूला गांभीर्याने घेत आहेत. घरात बसून स्वत:ची काळजी घेतली जात असून, सोशल मीडियावरून एकमेकांशी संवाद साधला जात आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांत शहरात एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. आता याच पार्श्वभूमीवर शहरातील काहीजणांनी घरात बसूनच “मी पिंपरी-चिंचवडकर’ ही सोशल मीडियावर मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. “प्रशासनाला सहकार्य करणार, करोनाला हद्दपार करणार’ या आशयाचे संदेश व्हायरल केले जात आहेत. शहरातील अनेक नागरिकांपर्यंत हे संदेश पोहोचविले जात असल्याने या मोहिमेचे कौतुक होत आहे, तसेच या मोहितेस उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत असल्याचे चित्र आहे.