माझ्याकडे सुशांतची ‘ही’ प्रॉपर्टी; ईडी चौकशीनंतर रिया चक्रवर्तीचा खुलासा

मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीची आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून कसून चौकशी करण्यात आली. आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीने एका संदेशाद्वारे तिच्याकडे असलेल्या सुशांतच्या संपत्तीबाबत खुलासा केला आहे.

याबाबत रियाने माध्यमांना एक संदेश पाठवला असून यामध्ये तिने, “माझ्याकडे असलेली सुशांतची एकमेव मालमत्ता.” असं लिहीत या मालमत्तेचे फोटो शेअर केले आहेत. रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, सुशांतने तिच्यासाठी लिहिलेल्या एका संदेशाचा व एका पाणी बॉटलचा समावेश आहे. तिने शेअर केलेल्या या पाणी बॉटलवर ‘छिछोरे’ (सुशांतच्या गाजलेला चित्रपट) असं लिहलं आहे.

काय आहे ‘तो’ संदेश?
रियाने दावा केल्याप्रमाणे सुशांतने रियासाठी तिच्या डायरीमध्ये एक संदेश लिहला होता. यामध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील सात गोष्टींबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. सुशांतच्या या कथित संदेशात त्याने, “मी माझ्या आयुष्याबद्दल कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यातल्या लिलूबद्दल कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यातल्या बेबूचा आभारी आहे. मी माझ्या जीवनात सरांचा आभारी आहे. मी माझ्या आयुष्यात मॅमसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यातील फजसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्व प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे,” असं लिहलं आहे.

कोण आहे लिलू, बेबू, सर, मॅडम आणि फज?
रियाने शेअर केलेल्या फोटोतील संदेश सुशांतने स्वतः आपल्या हस्ताक्षरात लिहल्याचा दावा रियाने केला आहे. या संदेशातील लिलू हा रियाचा भाऊ, बेबू म्हणजे खुद्द रिया, सर म्हणजे रियाचे वडील, मॅडम म्हणजे रियाची आई तर फज म्हणजे रियाचा कुत्रा असल्याचे रियाने सांगितले आहे. मात्र हा संदेश त्याने कधी लिहला याबाबत तिने कोणताही खुलासा केला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.