मुंबई – जागतिक फलंदाजांच्या नामावलीत विक्रमादित्य ठरलेले भारताचे तंत्रशुद्ध फलंदाज सुनील गावसकर कधीही भारतीय संघाचे प्रशिक्षक का होऊ शकले नाहीत, हा प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. आता त्याचे उत्तर खुद्द गावसकर यांनीच दिले आहे. एक फलंदाज म्हणून मी यशस्वी ठरलो असलो तरीही मी संघाला प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करू शकेन असा विश्वास मला नव्हता, त्यामुळेच मी या पदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली नाही, असे गावसकर यांनी सांगितले.
कसोटीत 10 हजार धावा पूर्ण करणारे गावसकर हे जगातील पहिले फलंदाज आहेत. 16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर 1987 साली त्यांनी निवृत्ती घेतली. 90 च्या दशकातील अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारली. यात संदीप पाटील, अंशुमन गायकवाड, कपिल देव यांची नावे आहेत. मात्र, गावसकरांसारखा महान फलंदाज भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक का होऊ शकला नाही, याचे उत्तर कधी कोणाला मिळाले नाही.
मी स्वत:ला कधी प्रशिक्षक म्हणून पाहिले नाही, अथवा मी वाटतही नाही. प्रशिक्षक किंवा निवडकर्ता होण्यासाठी आपल्याला एक एक चेंडू पाहावा लागेल आणि माझ्यात इतका संयम नाही. कारण मी छोट्या फरकाने सामने पाहतो. जेव्हा मी खेळत होतो आणि बाद होत होतो, तेव्हाही मी चालू सामना संपूर्ण पाहिला नाही. थोडा वेळ सामना पाहिल्यानंतर मी रूममध्ये जायचो आणि पुस्तक वाचायचो. गुंडप्पा विश्वनाथ किंवा माझे काका माधव मंत्री यांच्यासारखे मी कधीच प्रत्येक चेंडू पाहणारा माणूस नव्हतो, असेही त्यांनी सांगितले.
गावसकर यांनी समालोचन करताना अनेकदा भारतीय संघाच्या कामगिरीची समीक्षा केली आहे. त्यामुळे केवळ काठावर बसून सल्ला देण्यापेक्षा प्रत्यक्ष जबाबदारी का स्वीकारत नाही, असा सवाल चाहत्यांनी त्यांना अनेकदा विचारला होता.
फॅब फाइव्हला केले मार्गदर्शन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मण या भारतीय संघातील फॅब फाइव्ह फलंदाजांना गावसकर यांनी सातत्याने मार्गदर्शन दिले आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रशिक्षक बनण्यास त्यांनी बीसीसीआयला सातत्याने नकार दिला आहे. सचिन आणि द्रविड यांनी हे अनेकदा सांगितले आहे.