वडिलांच्या मारेकऱ्यांना मी माफ केले : राहुल गांधी

पुद्दुचेरी – वडिलांच्या हत्येची घटना माझ्यासाठी अतिशय यातनादायी आहे. मात्र, माझ्या मनात कुणाविषयीही राग किंवा द्वेषाची भावना नाही. वडिलांच्या मारेकऱ्यांना मी माफ केले आहे, अशी भावना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केली.

पुद्दुचेरी दौऱ्यात राहुल यांनी एका महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थिनीने राहुल यांना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येविषयीचा प्रश्‍न विचारला. एलटीटीई संघटनेने 1991 मध्ये तुमच्या वडिलांची हत्या घडवली.

वडिलांच्या मारेकऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटते, अशी विचारणा तिने केली. त्यावर राहुल यांनी त्यांना माफ केले असल्याची भावना व्यक्त केली. मी माझ्या वडिलांना गमावले. हृदय हिरावून घेण्यासारखीच ती बाब होती. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. अर्थात, हिंसा तुमच्यापासून काहीच हिरावू शकत नाही. माझे वडील माझ्या हृदयात जीवित आहेत. माझ्या माध्यमातून ते बोलत आहेत, असेही राहुल यांनी म्हटले. ते उत्तर भावल्याने उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. तामीळनाडूतील श्रीपेरूंबुदूर येथे 21 मे 1991 यादिवशी एका प्रचारसभेवेळी मानवी बॉम्ब बनलेल्या महिलेने स्फोट घडवला. त्या स्फोटात राजीव गांधी मृत्युमुखी पडले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.