“वाईट बाळासाहेब ठाकरेंसाठी वाटतं”; निलेश राणेंची शिवसेनेवर खोचक टीका

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांनी करोनाच्या संकटात एकत्र येण्याचे आवाहन केले. मात्र  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करणारे भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका बॅनरचा फोटो ट्वीट करून त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

निलेश राणेंच्या ट्वीटमध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांना लगावलेल्या टोल्यासाठी शनिवारी सकाळी राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते आणि नाईक समर्थक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्याची पार्श्वभूमी आहे. सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. भाजपाला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचे बोलले जात होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडले होते, पण तेवढ्यात पोलिसांनी मध्ये पडत हा प्रकार थांबवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.