पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच ग्रामीण भागातही करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. यामध्ये एक एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.परंतु, पुणेकरांनी नियमांचे काटेकोर पालन केले नाही, तर पुण्यात २ एप्रिलला कठोर निर्णय घेऊ, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना तुम्ही केव्हा लस घेतली? याबाबत विचारलं असता अजित पवार यांनी “मी लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी मी करत नाही. इतरांनी फोटो काढले कारण त्यांना पाहून लोक लस घेतील. पण मी फोटो काढला असता तर लस घेणारेही घेणार नाहीत”, असं अजित पवार म्हणाले आणि पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
दरम्यान,अजित पवारासोबतच्या बैठकीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला दिला गेला आहे.
‘हे’ आहेत अजित पवारांच्या बैठकीतील ठळक मुद्दे :
– 1 एप्रिलपासून पुण्यातील सर्व खासगी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे
– 50 पेक्षा अधिक संख्या लग्नाला उपस्थित नको, असं आवाहन करण्यात आलं आहे.
– 20 लोकांमध्ये अंतविधी करावेत.
– शाळा महाविद्यालय 31 एप्रिल पर्यंत बंद राहणार.