सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही – उद्धव ठाकरे

परभणी: युती केली नसती तर सरकार अस्थिर राहिले असते. म्हणून युती करावी लागली. तसेच सरकारने केलली कर्जमाफी मला पटलेली नाही. आता सरकार येऊ द्या मला शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करायचा आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. सोबतच रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी देणाऱ्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांना खडसावले.

गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पालम शहरातील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. या ठिकाणी रासप उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या बंडखोरीबाबत त्यांनी गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली.

सोबतच गुट्टे यांना उमेदवारी देणाऱ्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांना खडसावले. भ्रष्टाचाऱ्यांना उमेदवारी देऊन आमचे फोटो लावून प्रचारातही भ्रष्टाचार करणाऱ्या आणि तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्यांना आवरा. आपले सबंध चांगले आहेत, ते खराब करू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रासपच्या महादेव जानकर यांना खडसावले.

उद्धव म्हणाले, पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाला होता. विमा कंपनीचे दलाल पैसे घ्यायला येतात. मात्र पैसे देत नाहीत. पण त्यांना शिवसेनेने जागेवर आणत 1100 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी द्यायला भाग पाडले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी किती खायचे यावरही काहीतरी त्यांनी विचार करायला हवा. थोडी लाज बाळगायला हवी, अशा शब्दात त्यांनी यावेळी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली. आमच्यासमोर लढण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी शिल्लक राहिली नसल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.